15 November, 2008

.

"मोहोलेशे" ते "महाराष्ट्र" - अ.रा. कुलकर्णी
ह्यू एनत्संग या चिनी प्रवाशाने इ.स. ६४०-४१ च्या सुमारास महाराष्ट्रास भेट दिली होती. या देशाची संपत्ती, येथील प्रशासकीय कुशलता, आणि लोकांचे स्वभावविशेष यामुळे तो प्रभावित झाला होता. महाराष्ट्राला तो `मोहोलेश' म्हणतो, आणि या देशाच्या लोकस्थितीचे वर्णन करणारा कदाचित तो पहिलाच परदेशी प्रवासी असावा. तो म्हणतो, `महाराष्ट्राची भूमी सुपीक असून ते धनधान्याने समृद्ध आहे. तेथील लोक साधे, प्रामाणिक पण तापट आहेत. त्यांच्या जे उपयोगी पडतात त्यांशी ते कृतज्ञ असतात. पण त्यांना कोणी दुखविले तर ते सूड घेतल्याखेरीज राहात नाहीत. लढाईत पळपुट्यांचा ते पाठलाग करतात; पण शरण आलेल्यांना ते मारीत नाहीत. राजाजवळ हजारो शूर शिपायांचे सैन्य नित्य खडे असते. या प्रदेशाला `दंडकारण्य' असेही म्हणत आणि या प्रदेशाचे नाग, मुंड, भिल्ल इत्यादी आदिवासी समाज हे मूळ रहिवाशी होते. नंतरच्या काळांत उत्तरेकडून आर्य, शक, हूण लोक आले; दक्षिणेकडून द्रविडी लोक आणि सागरे मार्गाने परदेशी लोक आले. या सर्वांनी मिळून महाराष्ट्राची वसाहत केली, आणि महाराष्ट्राच्या रहिवाशांना `महारट्ट' म्हणून ओळखले जाऊं लागले.
महाराष्ट्राची प्राचीनता साधारणपणे इ.स.पू. तिसऱ्या शतकापर्यंत नेता येईल. कारण संस्कृत भाषेपासून उदयाला आलेली महाराष्ट्री भाषा ही इ.स.पू. चवथ्या अथवा तिसऱ्या शतकांत प्रचारात होती असे तज्ज्ञांचे मत आहे. आजची या प्रदेशाची मराठी भाषा या महाराष्ट्री-प्राकृत भाषेपासून विकसित झाली असून इ.स. च्या १०व्या शतकापासून ती प्रचलित झाली असावी. महाराष्ट्र हे नांव देखील या भाषेवरूनच पडले असावे. कालौघात या नांवाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात अपरान्त, विदर्भ, कुंतल, मूलक व अश्मक यांचा अंतर्भाव झालेला दिसतो.

मौर्य ते यादव (इ.स.पू. ते स. १३१० सुमारे २२०) :
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्रज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) अंतर्गत होता. या काळात महाराष्ट्राने भरभरटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराण होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतेचा मानला जातो. अर्थात्‌ या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरूष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा महत्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळांत महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत राजाश्रयामुळे उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळांतील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती. वाकाटकांनंतर कलचुरी राजघराणे इ.स. च्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.
वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणी इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमान होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्रकूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे कृष्ण पहिला या राष्ट्रकूट राजाने बांधले. महाराष्ट्राच्या कांहीं भागावर कल्याणीच्या चालुक्यांनी सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली.
यादवानी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१० पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता सपुष्टात आणली.यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्ती सांप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

मुसलमानांची राजवट:
इ,स, १२९६ मध्ये अल्ला‍उद्दिन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने प्रथम दख्खन प्रांतात प्रवेश करून यादवांचा पराभव केला. आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना प्रायः दरिद्री बनवले. सेनापती मलीक कफूर याने अल्ला‍उद्दिनाच्या कार्याची पूर्ती केली. आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली. अल्ला‍उद्दिनाचे अनुकरण मुहम्मद तुघलक (इ. स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता दक्षिणेतील मदुराईपर्यंत प्रस्थापित केली. मात्र दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्ला‍उद्दीन हसन बहमनी याच्या धुरीणत्वाखाली दक्षिणेत इ.स. १३४७ साली बहमनी घराण्याची स्थापना झाली ती सुमारे १५० वर्षे टिकली. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहमनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहमनी राज्याचे गोवळकोंड्याची कुत्बशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर सहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाच शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या.

मराठे:
सतराव्या शतकाच्या मध्यापासून महाराष्ट्रावर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित होण्यास प्रारंभ झाला. `मराठा' हा शब्द इतिहासाच्या दृष्टीने जातिवाचक नसून त्यांत महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचा प्रामुख्याने समावेश होतो. असे असले तरी महाराष्ट्रावर राजकीय सत्ता ही मुख्यत्वेकरून `मराठा' जातीने प्रस्थापित केली होती. हे मराठी भाषिक मराठे मूळचे कोण हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. मराठा हे नामाभिधान महाराष्ट्र देशापासून आले आहे, का मराठे या येथील रहिवाश्यांमुळे या देशाला महाराष्ट्र हे नांव मिळाले आहे हे सांगणे कठिण आहे. रिस्ले या प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाने शक-द्रविडांच्या मिश्र जमातीपासून मराठे उदयाला आले असा सिद्धांत मांडला होता. पण तो आता त्याज्य ठरला आहे. अर्थात महाराष्ट्रातील अनेक आदिवासी जमातींचा मराठ्यांच्या उत्पत्तीशी संबंध असावा हे सर्वस्वी नाकारता येणार नाही. मराठ्यांच्या अनेक कुळी देवक अथवा वंशचिन्ह मानणाऱ्या आहेत. खंडोबा आणि भवानी या मराठ्यांच्या प्रमुख देवता या आदिवासी स्वरूपाच्या आहेत.
मराठे आणि महाराष्ट्र यासंबंधीचे संदर्भ कांही परदेशी प्रवाशांच्या वृत्तांत आढळतात. यात अल्‌बेरुनी (इ.स. १०३०) फ्रायर जॉर्डनस (इ.स. १३२६ च्या आसपास), इब्न बतूता (इ,स, १३४०) यांच्या लिखाणारून असे उल्लेख आले आहेत. परंतु राजकीय क्षेत्रावर मराठ्यांच्या उदय खऱ्या अर्थाने सतराव्या शतकातच झाला. मराठ्यांच्या उदयाची कारणे इतिहासकारांनी निरनिराळी दिली आहेत. मराठ्यांच्या प्रसिद्ध इंग्रज इतिहासकार ग्रॅंट डफ यांच्या मते हा उदय सह्याद्री पर्वतात वणवा पेटावा तसा, अगदी दैवघटित परिस्थितीमुळे झाला. न्यायमूर्ती रानड्यांना मात्र प्रामाणिक प्रयत्न करून मराठ्यांनी आपला उदय करून घेतला असे वाटते. राजवाडे यांच्या मते परदेशी आणि दख्खनी मुसलमानांचे वर्चस्व रोखण्याकरता अहमदनरच्या निजामशहाने मराठ्यांना आपल्या दरबारांत हेतुपूर्वक उत्तेजन देऊन एक `मराठा पक्ष' निर्माण केला, आणि त्यातूनच मराठ्यांचा उदय झाला. भोसले, जाधव, निंबाळकर, मोरे, घोरपडे, माने, घाटगे, डफळे, सावंत, शिर्के, महाडिक, मोहिते इत्यादी मराठे सरदार निजमाशाही अथवा आदिलशाहीच्या चाकरीत असल्याने लष्करी आणि मुलकी प्रशासनाचे त्यांना उत्तम शिक्षण मिळाले होते. मालोजी भोसले (अंदाजे इ.स. १५५२ ते १६०६) हा निजामशाहीत एक छोटासा शिलेदार म्हणून नोकरीस लागला. त्याचा पुत्र शहाजी (१५९९ ते १६६४) याने तर निजामशाही, मुघल आणि आदिलशाही यांच्याकडे नोकरी करून बरेच श्रेष्ठत्व मिळविले होते. मराठ्यांच्या उदयास प्रारंभ मालोजी-शहाजीपासून झाला असे मानण्यास हरकत नाही.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजा:
शिवाजी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर १९.२.१६३० (जुनी तारीख ६.४.१६२७) रोजी झाला. मराठी राष्ट्र हे शिवाजी राजांची निर्मिती होय. शहाजीने आपली पुणे, सुपे येथील जहागीर, जी प्रायः स्वतंत्र होती. ती शिवाजी राजांना बहाल केली. त्यांनी मावल, कोकण, आणि देश या प्रदेशातील लोकांच्या समोर स्वराज्याचे, महाराष्ट्र धर्माचे ध्येय ठेवून त्यांना संघटित केले, आणि परकी सत्तांना परभूत करून स्वराज्य स्थापन केले. या नूतन महाराष्ट्र राज्याला कार्यक्षम लष्करी आणि सनदी प्रशासन देऊन त्यांनी ते भक्कम पायावर उभे केले. आर्थिक दृष्ट्या देखील ते स्वावलंबी बनविले. सर्वधर्मसमभावाचे तत्व आचरून सर्व धर्म पंथांना आपल्या राज्यांत सामावून घेतले. आपल्या राज्याभिषेक प्रंसंगी (१६७४) राजशक सुरू करणारा, आणि स्वतःची शिवराई आणि होन' ही सोन्याची नाणी चालू करणारा शिवाजी राजा हा पहिला मराठी छत्रपती होय. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे-वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी (५ एप्रिल १६८०) महाराष्ट्रांत एक पोकळी निर्माण झाली. मध्ययुगाच्या इतिहांसातील शिवाजी महाराजांचे स्थान सुप्रसिद्ध वंग इतिहासकार, यदुनाथ सरकार यांनी आपल्या शिवचरित्रांत विशद केले आहे. ते म्हणतात, " शिवाजी राजा हा केवल मराठी राष्ट्राचा निर्माता नव्हता, तर तो मध्ययुगांतील एक सर्वश्रेष्ठ रचनाकार, लोकोत्तर पुरुष होता. राज्ये नष्ट होतात, साम्राज्याचे विघटन होते, राजघराणी नेस्तनाबूत होतात, परंतु `लोकनायक राजा' अशा शिवाजी राजाची स्मृती म्हणजे मानवजातीला मिळालेला एक अक्षय ऐतिहासिक वारसा होय."
शिवाजी राजांचा पुत्र संभाजी (इ.स. १६५७-८९) याची कारकीर्द अवघे नऊ वर्षांची झाली. या छोट्या काळांत त्याला अंतर्गत कलह आणि शिद्दी, पोर्तुगीज, मुघल यासारखे शत्रू यांच्याशी मुकाबला करावा लागला. मुघलांच्या हातून त्याचा १६८९ साली जो अमानुष वध झाला त्यामुळे मराठी लोकामध्ये देशप्रेमाची जाज्वल्य भावना निर्माण झाली, आणि शिवाजी महाराजांचा कनिष्ठ पुत्र राजाराम (१६७०-१७००) याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाच्या सत्तेविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारले. आपला बलाढ्य फौजफाटा घेऊन औरंगजेब बादशहाने मरेपर्यंत (१७०७) मराठी सत्ता नेस्तनाबूत करण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
राजारामाच्या मृत्युनंतर त्याची पत्नी ताराबाई हिने स्वातंत्र्ययुद्धाची सुत्रे आपल्या हाती घेतली, आणि आपला पुत्र दुसरा शिवाजी यास छत्रपती म्हणून घोषित केले. परंतु औरंगजेबाच्या नजरकैदेत असलेला संभाजीचा पुत्र शाहू याची जेव्हा १७०७ साली सुटका झाली तेव्हा शाहूपक्ष आणि ताराबाई पक्ष असे दोन तट मराठी राज्यात पडले आणि त्यांच्यात यादवी युद्धाला सुरवात झाली. शाहूने साताऱ्यास तर ताराबाईने पन्हाळ्यास आपली स्वंतत्र गादी स्थापन केली. या दुसऱ्या गादीच्या संदर्भात १७१४ साली एक राजवाड्यांतच छोटीशी राज्यक्रांती कोल्हापुरात झाली. आणि राजारामाचा दुसरा पुत्र संभाजी (इ.स. १६९८ ते १७६०) यास कोल्हापूरची गादी मिळाली. शाहूने वारणेच्या तहान्वये (१७३१) संभाजीस कोल्हापूरचा छत्रपती म्हणून मान्यता दिली.

पेशवेशाहूच्या आमदानीत रायगड जिल्ह्यांतील भट घराणे मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्धीस आले. बाळाजी विश्वनाथ भट याने शाहूला त्याचे स्थान बळकट करण्यास मदत केल्याने त्यास पेशवे पद (१७१३-१७२०) प्राप्त झाले. मुघलांच्याकडून त्याने स्वराज्य, चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा आणल्या. त्याचा मुलगा पहिला बाजीराव ( पेशवा १७२० ते १७४०) याने पेशवाईची वस्त्रे स्वीकारल्यावर आक्रमक धोरणाचा अवलंब केला आणि महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उतरंडीस लागलेल्या मुघल साम्राज्याच्या विनाशातून मराठी सत्तेची वाढ करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली. त्याने मराठी सरदारांना उत्तरेचे दालन उघडून दिले, आणि यातूनच पुढे मराठ्यांनी छोटी छोटी राज्ये तिकडे निर्माण झाली. गुजरात, माळवा, बुंदेलखंड इत्यादी प्रदेश मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आले, आणि शिंदे, होळकर, गायकवाड, पवार यांच्यासारखे नवे मराठे सरदार उदयास आले. यदुनाथ सरकारांच्या मते बाजीरावाने बृहन-महाराष्ट्राची निर्मिती केली, आणि पुणे हा भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू बनला. बाजीराव पेशवा हा संपूर्णतया शिपाई गडी, एक देवजात शिलेदार होता. आपल्या छोट्याशा कारकीर्दीत त्याने दख्खन प्रदेशात मराठ्यांचे श्रेष्ठत्व आणि उत्तरेस मराठ्यांचे धुरीणत्व प्रस्थापित केले.
बाजीरावानंतर पेशवेपद हे भट घराण्यांत जवळजवळ वंशपरंपरा बनले. बाजीरावाचा पुत्र बालाजी तथा नानासाहेब (पेशवा १७४०-१७६१) याने मराठ्यांचे झेंडे अटकेपार फडकाविले. शाहूचा मृत्यू १७४९ साली झाला. त्याचा दत्तक पुत्र रामराजा हा कर्तृत्ववान नसल्याने नामधारी छत्रपती राहिला व सर्व सत्ता पेशव्यांकडे केंद्रीत झाली. १७६१ साली अहमदशहा अब्दालीकडून पानिपतच्या रणसंग्रामात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. मराठी सत्तेला शह मिळाला पण ती नेस्तनाबूत झाली नाही. नानासाहेबाचा पुत्र पेशवा पहिला माधवराव ( पेशवा १७६१-१७७२) याने शत्रूंचा बीमोड करून आणि उत्तम प्रशासन करून मराठ्यांचे वर्चस्व पुनश्च प्रस्थापित केले. पण त्याचा अकाली मृत्यू हा मराठी सत्तेला शाप ठरला. ग्रॅण्ट डफ म्हणतो, या गुणवंत पेशव्याचा अकाली मृत्यू हा मराठी साम्राज्याला पानिपतापेक्षा फार हानिकारक ठरला. गृहकलहाने त्याचा भाऊ पेशवा नारायणराव (१७७३) याचा अमानुष वध केला. नारायणरावाच्या मरणोत्तर जन्माला आलेला त्याचा पुत्र पेशवा माधवराव दुसरा (पेशवा १७७३-१७९५) याने कारभाऱ्यांच्या सहाय्याने ( ज्यांना बारभाई म्हणत ) मराठी राज्याची धुरा सांभाळली. यात महादजी शिंदे आणि नाना फडणवीस या दोन कारभाऱ्यांचा मोठा वाटा होता. छत्रपतीकडून पेशव्यांकडे आलेली सत्ता आता कारभाऱ्यांकडे गेली.
याच सुमारास पश्चिम किनाऱ्यावर ठाण मांडून बसलेले इंग्रज हळूहळू मराठ्यांच्या राजकारणांत प्रवेश करू लागले होते. वस्तुतः १७८१ साली, पहिल्या इंग्रज-मराठे युद्धात, मराठ्यांनी त्यांना नमविले होते; परंतु शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव ( पेशवा १७७५-१८१८ ) हा संपूर्णतः त्यांच्या आहारी गेला आणि १८१८ साली मराठी सत्ता संपुष्टात आली. मराठी राज्याची वासलात लावणाऱ्या माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने मराठ्यांची सहानुभूती मिळविण्याच्या हेतूने साताऱ्याचे छोटेसे राज्य निर्माण केले आणि त्यावर प्रतापसिंह (१७९३-१८७४) या एका छत्रपतीच्या वंशजाची `राजा' दुय्यम प्रतीचा किताब देऊन नेमणूक केली. पुढे १८३९ साली त्याला पदच्युत करून त्याचा भाऊ शहाजी उर्फ आप्पासाहेब यास साताऱ्याची गादी देण्यात आली, आणि पुढे १८४९ सालीं हे साताऱ्याचे राज्य खालसा करण्यात आले.
अशा रीतीने सुमारे दोनशे वर्षे भारताच्या राजकीय इतिहासावर प्रभाव टाकणाऱ्या मराठ्यांची सत्ता नामशेष झाली.मराठ्यांची परंपरा आणि इतिहास हा असा उज्वल आहे. यदुनाथ सरकार यांनी मराठ्यांची भारतीय इतिहासांतील कामगिरी समर्पक शब्दांत व्यक्त केली आहे. ते म्हणतात, `आजच्या भारतात त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे, मराठ्यांना एक अनन्यसाधारण असे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या अगदी नजीकच्या पूर्वजांनी अनेक समरांगणावर आपले देह अर्पण केले आहेत; त्यांनी सेनापतीपदे भूषविली, राजनीतीक्षेत्रांत भाग घेतला, राज्याची आर्थिक बाजू सांभाळली, साम्राज्याच्या समस्यांशी सामना केला, आणि स्मृतिआड न झालेल्या नजीकच्या काळातील भारताच्या इतिहासाच्या घडणीस हातभार लावला. या सर्व गोष्टींच्या स्मृती म्हणजे या जमातीचा अमूल्य ठेवा होय'

इंग्रज शिवाजी महाराजांचा उदय होत असतानाच इंग्रज आपली व्यापारी मक्तेदारी पश्चिम किनाऱ्यावर मिळविण्याच्या प्रयत्नांत होते. शिवाजी राजांची वाढती सत्ता ही त्यांना धोकादायक वाटत होती. शिवाजी महाराजांनी त्यांना व्यापाराच्या सवलती दिल्या, पण मराठी भूमीवर ते पाय रोवून उभे राहणार नाहींत याची दक्षता ठेवली. कारण व्यापाराचे निमित्त करुन प्रदेश बळकावयाचा ही त्यांची सुप्त इच्छा महाराजांना उमजली होती. पण इंग्रजांची ही कुटिल नीती पेशव्यांच्या ध्यानी न आल्याने नानासाहेब पेशव्याने त्यांना मराठ्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याची संधी उपलब्ध करून दिली, आणि १७५४ साली कुलाब्याच्या आंगऱ्यांच्या आरमाराचा धुव्वा उडविला. मराठेच स्वतःचे संहारक आहेत हे आतापवेतो इंग्रजांनी ओळखले होते. मद्रासच्या लष्करी पत्रसंग्रहातील १७ एप्रिल १७७० च्या एका पत्रात म्हटले आहे की आपापसातील कलहामुळे मराठे आपला विनाश ओढवून घेतील हे आता लक्षात आले आहे, आणि त्याला तशी सबळ कारणे आहेत. मराठे सरदार हे एकमेकाविरुद्ध मिळणारी एकही संधी दवडणार नाही हे हिंदुस्थानांतील इतर सत्तांना लाभदायकच ठरणार आहे.परंतु मराठ्यांना मुळासकट उखडून काढणारा यशस्वी मुत्सद्दी म्हणजे माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन हा होय. १८११ साली तो प्रथम पुण्यांत रेसिडेंट म्हणून आला. मराठ्यांची सत्ता नष्ट करण्याचे मनसुबे त्याने रचले. १८१७ साली अखेरच्या इंग्रज-मराठे युद्धाला तोंड फुटले, आणि शेवटी ३ जून १८१८ रोजी दुसरा बाजीराव हा माल्कमला शरण गेला; आणि मराठी राज्याचे वैभव नष्ट झाले.
पेशव्यांपासून जिंकून घेतलेल्या प्रदेशावर १८१९ साली कमिशनर आणि नंतर मुंबई प्रांताचा गव्हर्नर बनला. महाराष्ट्रात ब्रिटिश राजवटीची पायाभरणी एलफिन्स्टनने केली. प्रशासनांत त्याने विशेष बदल काही केले नाहीत, पण जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावणे, शैक्षणिक धोरण अवलंबिणे, पेशव्यांच्या दक्षिणा फंडातून संस्कृत कॉलेज ( जे पुढे डेक्कन कॉलेज बनले ) स्थापन करणे इत्यादी महत्त्वाची कामे त्याने केली.

इंग्रज सत्तेविरुद्ध बंडावा:
मराठ्यांना इंग्रजांची राजवट केव्हांच रुचली नाही. इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध ते सतत बंडावा करीत. उमाजी नाईकाच्या नेतृत्वाखाली १८२६ सालीं पुणे जिल्ह्यांतील रामोशांनी बंड करून इंग्रजांना सतावून सोडले, आणि शेवटी त्यांना समझोता करावयास लावला. सरकारने रामोश्यांचे गुन्हे माफ केले, त्यांना सरकारी नोकरीत प्रवेश दिला आणि इनाम जमिनीही दिल्या. नाशिकचा राघु भांग्‌ऱ्या, नगरचा रामजी आणि त्याचा साथीदार रतनगडचा किल्लेदार गोविंदराव खारी यांना इंग्रज सत्तेला शह दिला. पुणे आणि नगर जिल्ह्यांतील कोळीही संघटित झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या साऱ्या अशिक्षित आणि दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या निःशस्त्र लोकांनी इंग्रज सत्तेला विद्वानांच्या स्वातंंत्र्य लढ्यापूर्वी कितीतरी आधी आव्हान दिले होते.१८५७ च्या उठावात महाराष्ट्राचा फारसा वाटा नव्हता. पण या उठावाचे पुढारी नानासाहेब, तात्या टोपे, झांशीची महाराणी लक्ष्मीबाई ही सारी मंडळी होती.१८५७साली पुणे, सातारा, नगर येथील शेतकऱ्यांनी जुलमी सावकारांच्या विरुद्ध उठाव केला. ब्रिटिशांच्या पाठिंब्यामुळे हे सावकार जुलूम करीत होते. शेतकऱ्याचे दंगे या नावांने ही घटना ओळखली जाते. न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका यांनी रयतेची बाजू मांडली. सरकारने नंतर १८७९ साली डेक्कन ऍग्रिकल्चरल रिलिफ ऍक्ट पास करून शेतकऱ्यांना संरक्षण दिले.
वासुदेव बळवंत फडके याने सशस्त्र प्रतिकाराच्या धोरणाचा अवलंब करून इंग्रजांना हुसकावून भारतीय गणराज्याची स्थापना करण्याची मोहीम १८७९ साली सुरू केली. पण त्याला यश आले नाही. त्याला अटक करून एडन येथे कारावासात ठेवले. तेथेच तो १८८३ सालीं मरण पावला. पुढे चाफेकर बंधूंनी २२ जून १८९७ साली पुणे येथे रॅंड आणि लेफ्टनंट आयर्स्ट यांचे खून केले, आणि फाशीची शिक्षा स्वीकारली. मराठ्यांचा इंग्रजांना सतत विरोध राहिला याचे कारण त्यांनी आपल्या सर्वस्वाचे अपहरण केले आहे याचे त्यांना कधीच विस्मरण पडले नाही. इंग्रजांनी हिंदुस्थान जिंकला तो मराठ्यांच्या पराभव करून, आणि म्हणूनच मराठ्यांचा आपल्याला विरोध राहणार याची त्यांना कल्पना होती जी. डब्ल्यू. स्टीव्हन्सने १८९९ साली प्रसिद्ध झालेल्या इंडिया ऑफ यस्टर इयर्स या पुस्तकात ती व्यक्त केली आहे.

सामाजिक सुधारणा चळवळी:
मुंबई, पुणे यासारख्या नगरांतील बुद्धिवादी लोकांवर पाश्चिमात्य शिक्षणाचा जो प्रभाव पडत होता यातूनच एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणेच्या चळवळीचा प्रारंभ झाला. या सुधारकांनी अंतर्मुख होऊन आपली समाजव्यवस्था, धार्मिक रूढी, यांचा चिकित्सकपणे अभ्यास करून राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणांना अग्रक्रम दिला. प्रारंभी या कार्यात त्यांना सनातनी लोकांकडून कडवा विरोध सहन करावा लागला. बाळशास्त्री जांभेकर (१८१२-४६) यांनी सतीची चाल, लहान मुलींची हत्या, या रुढींचा धिःकार तर केलाच, परंतु हिंदू धर्माचा त्याग करून परधर्म स्वीकारलेल्या लोकांना परत स्वधर्मात यावयाचे असेल तर शुद्धीकरणाची मुभा असली पाहिजे यासाठी झगडा केला. गोपाळ हरी देशमुख तथा लोकहितवादी (१८२३-९२) यांनी आपल्या शतपत्रे या संग्रहातून सामाजिक आणि धार्मिक सुधारणांना विरोध करणाऱ्या सनातनी ब्राह्मणांवर कडाडून हल्ला केला. जोतीराव गोविंदराव फुले (१८२७-१८९०) यानी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जाती व्यवस्थेवर आघात केले, हरिजनांचा पक्ष उचलून धरला, आणि मागासलेल्या समाजांतील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जीवापाड मेहनत केली. रामकृष्ण गोपाळ भांडारकर (१८३७-१९२५) आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१) यांनी सामान्य सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रार्थना समाज स्थापण्याच्या कामी पुढाकार घेतला. गोपाळ गणेश आगरकर (१८५६-१८९५) यांनी सामाजिक सुधारणांना अग्रक्रम दिला. धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) यांनी तर आपले सारे जीवन स्त्रीशिक्षणासाठी समर्पित केले. बेहरामजी मलबारी (१८५३-१९१२) या मुंबईच्या पारशी सुधारकाने सर्व जातींच्या स्त्रियांसाठी सेवा सदन ही संस्था काढली. पंडिता रमाबाई (१८५८-१९२२) यांनी शारदा सदन संस्था काढून वरिष्ठ वर्गातील विधवा स्त्रियांना संरक्षण दिले.
ऑक्सफर्ड विद्यापीठाची पदवी धारण करणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (१८७३-१९४४) यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था काढली. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज (१८७४-१९२२) यांनी जाति संस्थेला विरोध केला, हरिजनांचा पक्ष उचलून धरला, आणि आपल्या संस्थानात शिक्षण प्रसाराचे मोठे कार्य केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील (१८८७-१९५९) यांनी महात्मा फुले, महर्षी शिंदे आणि शाहू महाराज यांच्या कार्याची परंपरा चालविली. डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६) यांचा महाराष्ट्राला सतत अभिमान वाटेल. त्यांनी हरिजन जमातीमध्ये सामाजिक आणि राजकीय जागृती निर्माण केली. भारताच्या संविधानाचे ते प्रमुख शिल्पकार होते. हिंदु धर्मातील अनिष्ट आणि जुलमी रूढी आणि परंपराशी ते सतत झगडत राहिले.

महाराष्ट्र आणि स्वातंत्र्य संग्राम :
भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन १८८५ साली महाराष्ट्राच्या राजधानीत-मुंबईस-भरले होते. समाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्यांबद्दल लोकमत बनविण्यासाठी न्यायमूर्ती रानड्यांनी निरनिराळ्या संस्था काढल्या आणि राष्ट्रीय चळवळीला उदारमतवादाची दिशा दाखविली.दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वाच्छा, ही मुंबईची पारशी मंडळी कॉंग्रेसच्या धुरीणांपैकी होती. १८९० ते १९२० या कालखंडातील महाराष्ट्राचे दोन राजकारण धुरंधर म्हणजे बाळ गंगाधर टिळक (१८५६-१९२०) आणि गोपाळ कृष्ण गोखले (१८६६-१९१५). शिवाजी उत्सव आणि गणेश उत्सव यांच्या माध्यामातून टिळकांनी बहुजन समाजाला देशाच्या राजकारणांत आणले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा मंत्र त्यांनी स्वांतत्र चळवळीला दिला. भारतातील असंतोषाचे जनक अशी त्यांची ओळख इंग्रजांनी करून दिली आहे. न्यायमूर्ती रानड्यांचे शिष्य गोखले हे बुद्धिवाद्यांचे पुढारी होते. समन्वय आणि समझोता हे त्यांच्या राजकीय धोरणाचे मुख्य सूत्र होते. महाराष्ट्र हा लढाऊ वृत्तीच्या लोकांचा देश असल्याने जनमानसावर लोकमान्यांच्या विचारसरणीचा अधिक प्रभाव होता.
अभिनव भारत या दहशतवादी विचारसरणीचा विश्वास असणाऱ्या संस्थेचे अध्वर्यू विनायक दामोदर सावरकर हे तरूणांचे लाडके नेते होते. महात्मा गांधी नामदार गोखल्यांना आपले राजकीय गुरू मानीत. महाराष्ट्र हे रचनात्मक कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, असे ते म्हणत. महाराष्ट्राने त्यांच्या विविध चळवळींना उत्तम प्रतिसाद दिला. याच सुमारास काकासाहेब गाडगीळांच्या आर्जवी प्रयत्नांमुळे केशवराव जेध्यांच्या नेतृत्वाखाली बहुजनसमाज कॉंग्रेसमध्ये सामील झाला. भारत छोडो हा निर्वाणीचा इशारा १९४२ साली इंग्रजाना मुंबई येथे देण्यात आला या इशाऱ्याची परिणती पुढे १९४७ साली राजकीय सत्तांतरात झाली. रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि इतर असंख्य राष्ट्रभक्तांनी या शेवटच्या लढ्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बाळासाहेब खेर हे मूळच्या त्रैभाषिक मुंबई इलाख्याचे पहिले महामंत्री होत. मोरारजी देसाई यानी नंतर त्यांची जागा घेतली.

संयुक्त महाराष्ट्र कॉंग्रेसने भाषावर प्रांतरचनेचे तत्त्व मान्य केले होते. पण १९५६ सालच्या राज्यपुनर्रचना समितीने महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र ते लागू केले नाही आणि येथे गुजराती व मराठी लोकांचे द्वैभाषिक राज्य निर्माण करून मुंबई राजधानी केली. महाराष्ट्रात यावर तीव्र प्रतिक्रिया झाली. केशवराव जेध्यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे एक सर्वपक्षीयांची सभा होऊन ६ फेब्रूवारी १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत या समितीला भरघोष यश मिळाले. विधानसभेच्या १३३ पैकी समितीला १०१ जागा मिळाल्या. यात मुंबई शहराच्या १२ जागा होत्या. गुजरात, मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सहकार्याने कॉंग्रेसला मंत्रिमंडळ बनविता आले. या विशाल द्वैभाषिकाचे यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री बनले. एस. एम. जोशी, डांगे, नानासाहेब गोरे, आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा तीव्र केला. काही लोकांना आत्मबलिदान करावे लागले. पण कॉंग्रेसचे मतपरिवर्तन करण्यात त्यांना शेवटी यश आले. नेहरूंच्या मंत्रिमंडळातील चिंतामणराव देशमुखांनी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
१ मे १९६० रोजी, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा यांचे `महाराष्ट्र राज्य' निर्माण झाले. मोहोलोश ते महाराष्ट्र ही ऐतिहासिक वाटचाल १९६० मध्ये पूर्ण झाली. आणि मराठी माणसाचे अनंत वर्षांचे स्वप्न साकार झाले. ह्यूएनत्संगने तेराशे वर्षांपूर्वी रेखाटलेल्या प्रतिमेशी नूतन महाराष्ट्राचा तोंडवळा मिळताजुळता आहे.