13 August, 2009

दवंडी : पळा रे पळा.. आकाश पडलं !!!

माध्यम क्रांती अनेक संधी उपलब्ध करुन देते. निवडीला पर्याय देते. पण उडदामाजी काळे गोरे कसे निवडावे? काय घडतंय यापेक्षा काय काय घडणार आहे आणि त्याला आपण कसे सामोरे जाणार आहोत. त्याचा फायदा आपण कसा करुन घेणार आहोत हे ठरवण्यासाठी ही दवंडी..

एकदा एका राज्यात एक राजा राज्य करीत होता. (प्रत्येक कथेची सुरुवात अशीच करायची असते.) एकदा त्याचे केस कापताना त्याच्या नाभिकाच्या असे लक्षात आले की, राजाला तीन कान आहेत. त्याला हसू आले. राजाने त्याला दटावले. कोणालाही हे सांगितलेस तर मुंडके उडवीन अशी धमकी दिली. त्या नाभिकाची मोठी पंचाईत झाली. आपल्याला एवढे मोठे रहस्य माहीत आहे आणि आपण ते कुणालाच सांगायचे नाही? बायकोलाही नाही? हैराण झाला तो.. दोन दिवस त्याने कळ काढली, पण मग त्याच्या पोटातच दुखू लागले. शेवटी तो एका जंगलात गेला आणि एका हरणाच्या कानात त्याने ही गोष्ट सांगितली.. राजाला तीन कान.. मन मोकळे झाले. पोटदुखी थांबली. तो परत आला. पुढे कुणी तरी त्या हरणाची शिकार केली. त्याच्या चामडय़ापासून कुणी तरी वाद्य केले. वाद्य वाजवणारा राजाचे मन प्रसन्न करण्यासाठी राजवाडय़ात आला. त्याने वाद्य वाजवायला सुरुवात केली आणि त्यातून राजाला तीन कान, राजाला तीन कान असेच बोलू उमटू लागले.


तात्पर्य काय, एखादी गोष्टी कितीही दाबून टाकली तरी ती केव्हा तरी समोर येतेच. कशीही येते, पण आजकाल एवढा काळ थांबायची गरज राहिलेली नाही आणि जंगलात जाऊन हरणाचे कान फुंकायचीही गरज राहिलेली नाहीए. अशी हरणं पावलोपावली भेटतात. आणि त्यांच्या कानात बातम्या सोडणाऱ्या माध्यमांचा तर काय सुकाळूच झालेला आहे.

कुणीतरी म्हटलेलं आहे की, बॅड न्यूज इज अ व्हेरी गुड न्यूज. कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी होत नाही.. माणूस कुत्र्याला चावला तर होते. त्यामुळे सध्या माध्यमांना सुगीचे दिवस आलेले आहेत. स्वाइन फ्लू या रोगाने त्यांचा बातम्यांचा प्रश्न सोडवून टाकलेला आहे. कुणाला माझं बोलणं क्रूरपणाचं वाटेल, पण जरा नीट शांत डोक्याने विचार करा. सगळे डॉक्टर्स ओरडून सांगत आहेत की, स्वाइन फ्लू हा प्रश्नणघातक रोग नाहीए. जे बळी गेले ते एक तर निष्काळजीपणाचे आहेत किंवा त्यांना एकाच वेळी अनेक आजार झाले होते. ज्याचे निदान झाले तर केवळ सहा दिवसांमध्ये माणूस खडखडीत बरा होतो अशा या रोगाला जणू काही प्लेगची साथ आली आहे असे स्वरूप देण्यास माध्यमे कारणीभूत आहेत.

दिल्लीमें स्वाइन फ्लू का एक रोगी मिला.. स्कूलमें लगा ताला.. अहमदाबादमे स्वाइन फ्लूने किया हमला.. एकने गवाँई जान किंवा पुण्यात हाहा:कार.. जनतेत घबराट.. अशा बातम्या देऊन लोकांच्या मनात कमालीची भीती निर्माण करण्यात येते आहे. होय, आहे. हा आजार आहे. त्याचा प्रसार शिंकांतून, खोकल्यातून होतो. काळजी घेण्याची आवश्यकता आहे हे सगळं खरं असलं तरी साप साप म्हणून भुई धोपटण्यासारखा प्रकार होतो आहे. सरकार पातळीवरून पत्रकबाजी करून त्यात आणखी भर टाकली जाते आहे.

मेक्सिकोसारख्या देशाने अत्यंत कमी कालावधीत या रोगाचे जवळपास उच्चाटन केले. सोपी गोष्ट. गर्दी टाळा. सगळी पब्लिक फंक्शन्स बंद करा. शाळा-कॉलेज ऑफिसेस काही काळ बंद करा. सहा दिवसांचे या व्हायरसचे आयुष्य आहे. त्यानंतर तो मरेल. त्यांनी हे केले. आपल्याकडे हे होणार नाही. कारण आपल्याला उत्तरं शोधायची नाहीएत. प्रश्नांचा बागुलबुवा करून त्यावर पोळी भाजून घेण्यात आमच्या लोकांना रस आहे. या रोगावर टॅमी फ्लू नावाची एक गोळी आहे. पण ती म्हणे फक्त सरकारी दवाखान्यातच मिळते. का? का नाही सगळीकडे मिळत? रक्त तपासणी करणाऱ्या लॅब इतक्या कमी का? सरकारी इस्पितळाची परिस्थिती पाहिली तर तिथे लोकांनी येऊन कल्ला करावा असं करण्यामागची मनोवृत्ती आणि गर्दीच्या वेळी नाकाबंदी लावून लोकांचे हाल करणे किंवा तेव्हाच रस्त्याची कामे काढणे यामागची सरकारी मनोवृत्ती एकच आहे. लोकांना त्रास झाला पाहिजे. लोकांनी आपल्याकडे दयेची भीक मागितली पाहिजे. नाही तर मग आम्ही नेते कसे? लोकांचे प्रश्न सुटले तर आपल्याकडे कोण येईल? लोक कायम रंजलेले गांजलेले राहिले तरच या तथाकथित नेत्यांना महत्त्व आहे.

जरा आकडेवारी पाहा. पुण्याची लोकसंख्या साधारण पस्तीस लाख. त्यात रुग्ण ११८. मुंबईची लोकसंख्या किती? दीड कोटी. रुग्ण किती ५५. काय गुणोत्तर प्रमाण आहे? नगण्य. पुण्यामध्ये आणि मुंबईत लाखो लोकांना टीबी झाला असेल. जो जास्त धोकादायक आहे. त्याचाही प्रसार थुंकीतून, श्वासातून होतो. त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. साध्या फ्लूमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या स्वाइन फ्लूच्या बळीपेक्षा किती तरी पटींनी जास्त आहे. सांगणारे कंठशोष करून सांगतात. पण ऐकतो कोण? माध्यमांची ताकद वाईट गोष्टींसाठी वापरली जाते आहे.

जगात कोणत्याही गोष्टीची विक्री ही केवळ भीती या भावनेनेच करता येते. फिअर फॅक्टर महत्त्वाचा, असं केलं नाही तर तसं होईल. की आपण लागलो धावायला. एका सशाच्या पाठीवर झाडाचं पान पडलं तर तो वळूनही न पाहता आकाश पडलं, आकाश पडलं, म्हणून धावत सुटला. समोर दिसेल त्याला सांगत सुटला.. पळा रे पळा.. आकाश पडलं. तसं आपलं झालंय. अत्यंत शांतपणे संघटितपणे याचा मुकाबला आपल्याला सहज करता येईल असं का नाही वाटत आपल्याला? आणि एवढं आपलं काळीज जर सशाचं असेल तर मग खरोखरीची भयग्रस्त करणारी परिस्थिती आली, तर आपण त्याला कसं तोंड देणार आहोत. माध्यमांनी मनोबल वाढवायचं की खच्ची करायचं? याच्याकडे कुणी लक्ष देणार आहे की नाही? का पेपरात आलेली प्रत्येक बातमी आणि टीव्हीवर आलेली प्रत्येक ब्रेकिंग न्यूज ही ‘बाबा वाक्यम प्रमाणम’ म्हणून आपण त्यावर आपलं जीवन अवलंबून ठेवणार आहोत? या सगळ्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. स्वाइन फ्लू उद्या जाईल, पण त्यातून काही धडा आपण शिकणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे.

No comments: