28 October, 2009

असंच मरा लेको..

.

राजकारण्याना शिव्या देण ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे.

राजकारणी स्वार्थी असतात मान्य आहे, पण ते मुर्ख नक्कीच नसतात.

आणि ते येतात कुठून??? आपल्यातुनच ना? मग त्यांच्या नावाने बोंबलण्यात काय अर्थ आहे ?

राजकारणातील घराणेशाही हा पण फसवा शब्द आहे. घराणेशाही कुठे नसते???

मग त्यांच्या नावाने रडण्यात काय अर्थ आहे??

अहो, पीठाची गिरणी चालवणारा माणूस पण आपली गिरणी आपल्यानंतर आपल्या मुलाकडेच सोपावतो, मग राजकीय वारसा कुणी तरी दुस-याला देइल काय???

तुमच्या घरातलं कुणी राजकारणात काही करू शकलं नाही, ही 'बिचा-या' युवा नेत्यांची चुक असू शकत नाही.

तुमचे वडील, काका, मामा जर राजकारणी असते, तर तुमचे हे मत असले असते का???

जे लोक मुंबई मध्ये दोन-तीनशे लोकांचे बळी गेल्या नंतर सुद्धा मतदानाला बाहेर पडत नाहीत, त्यांच्यासाठी नियतीने असंच मरण लिहिलेलं आहे.

लक्षात ठेवा, गेले ते जात्यात होते, तुम्ही सुपात आहात ..


असंच मरा लेको, तीच तुमची लायकी आहे !!!

.

27 October, 2009

साहेब, काय केलत हे???

.

कालच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे चक्क लहान मुलानी भाषण पाठ केल्यासारखे बोलले.
प्रश्न काय, उत्तर काय, कशाचा ही कशाला संबंध नाय !!!

"गरज पडल्यास हिंदुत्व" ही नवी व्याख्या, नवी कल्पना भारतीय राजकारणात काल त्यानी आणली।
आणि शिवसेनेचा पराभव झाला नाही म्हणने तर बालिशपणाचे नाही तर वेडगळपणाचे आहे.
"एक ही आमदार निवडून न येण" अशी कदाचित त्यांची पराभवाची कल्पना असेल !!

मराठी माणूस आज पण शिवसेनेच्याच पाठीशी आहे,
कारण शिवसेना ही मराठी मनाची भावनिक गरज आहे..
राज ठाकरे चालवतात ती शिवसेना आहे, मग त्यांच्या पक्षाचं नाव काहीही असो...
राज आज दोन आकड्यात खेळत आहेत, २०१४ ला तीन आकड्यात खेळणार हे नक्की...

मुळात उद्धव ची काहीच चुक नाही, त्यांच्यात पात्रताच नाही तर ते तरी बिचारे काय करणार??? !!!

महाराष्ट्राचे दुर्दैव, दुसरे काय !!! महाराष्ट्रपुरुष ढसढसा रडत असेल आज!!!

खंत फक्त एवढीच आहे, की शेवटच्या काळात बाळासाहेबाना हे दिवस बघावे लागले...
विधानसभेवर भगवा फडकल्यानंतर साहेब दाढी काढणार होते...

.

काळजातली जखम..

.

काळजातली जखम, अशी कधी कधी भळभळायला लागते..


आपल्या राष्ट्रगीताचा अर्थ लावण्याचा प्रयत्न कधी केला आहेस का तु ???


आपलं दुर्दैव हे, की आपल्याला... आपल्या राष्ट्रगीताचा अर्थच कधी शिकवला जात नाही॥


इंग्रजांचा राजा पंचम जोर्जच्या स्वागतासाठी लिहिलेल्या गाण्यातलं पहिलं कडवं आपण चक्क राष्ट्रगीत म्हणुन स्वीकारलं आहे॥


आता बघ कसा पटापट अर्थ लागतो !!!


"जन-गनाच्या मनाचा अधिनायक असलेल्या हे भारत भाग्यविधात्या (पंचम जोर्जा)


तुझा जयजयकार असो !!!


पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रावीड, उत्कल, वंग (हे प्रदेश आणि )


विंध्य-हिमाचल-यमुना-गंगा आणि उसळणारे सागर


( थोडक्यात जमीन, पर्वत, नद्या, सागर सर्व )


तव शुभ नामे गाहे, आणि तव शुभ आशिष मागे !!!


आणि वर गाहे तव जय गाथा !!!!


जन-गणासाठी मंगलदायका, हे भारत भाग्यविधात्या (पंचम जोर्जा) जय हे॥ ( तुझा जयजयकार असो !!!)


जय हे, जय हे, जय हे... ( त्रिवार जयजयकार) जय जय जय जय हे !!!!!!( असंख्य वेळा जयजयकार असो !!!)



भारतात आजही करोडो मुले इंग्रजांचा तेंव्हाचा राजा पंचम जोर्जचा दररोज जयजयकार करतात...



अज्ञानात आनंद !!! दुसरं काय म्हणनार ??



आता कसं वाटतय ???



---------------------------------------------------------------------



22 August, 2009

गीतारहस्याच्या यशापयशाचे रहस्य


जीवनात नैराश्याचे ढग जमू लागले असताना टिळकांनी गीतारहस्य लिहिलं ते पेन्शनरांसाठी नव्हे तर तरुणांसाठी. हा ग्रंथ अलौकिक बुद्धिमत्ता, अचाट स्मरणशक्ती आणि चिकाटीचे उत्तुंग स्मारक आहे. अर्थात गीतारहस्याच्या माध्यमातून टिळकांचं संप्रदायिकरण झालं का असा प्रश्नही उपस्थित होतो.
डॉ. यशवंत रायकर

१९१५च्या जून महिन्यात प्रसिद्ध झालेल्या गीतारहस्याच्या सर्व प्रती संपल्यामुळे लगेच सप्टेंबर महिन्यात पहिले पुनर्मुद्रण करावे लागले. पहिल्या महायुद्धाच्या त्या काळात कागदाची तीव्र टंचाई होती. तरी मुंबईतील ऑपेरा हाऊसजवळील रे पेपर मिलने अगत्याने कागद पुरविला. सध्या पेपर मिल लेन त्याची आठवण मुकाटय़ाने जपते. पुण्यातील तीन छापखान्यात ते छापले गेले. आज ही प्रत हाताळताना ९४ वर्षांपूर्वीच्या टिळकयुगात गेल्याची अनुभूती मिळते. ‘‘मी ज्या शतकात जन्मलो त्या शतकाला भूषण होण्याजोगा ग्रंथ लिहिणार आहे’’ असे आत्मविश्वासाचे उद्गार टिळकांनी आधी काढले होते. ते मंदलेच्या तुरुंगात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संकल्पित गीतारहस्य साडेतीन महिन्यांत हाताने लिहून सार्थ केले. हा ग्रंथ म्हणजे अलौकिक बुद्धिमता, अचाट स्मरणशक्ती, अफाट ज्ञान तसेच भाषाप्रभुत्व, बौद्धिक शिस्त, दृढनिश्चय, चिकाटी, लिहिणाऱ्या हाताची क्षमता वगैरे गुणांचे उत्तुंग स्मारक आहे. टिळकांच्या लोकप्रियतेचा तो उच्चांक होता. तरी काळ प्रतिकूल होत असल्याची वेदनाही प्रस्तावनेत व्यक्त होते.

‘‘कृतान्तकटकाऽमल ध्वज जरा दिसो लागली।
पुर:सरगदांसवे झगडिता तनू भागली।।
अशी आमची स्थिती असून संसारातील सहचरीही पुढे निघून गेले. यासाठी आपल्याला उपलब्ध असलेली माहिती व सुचलेले विचार लोकांस कळवावे, कोणीतरी समानधर्मा सध्या अगर पुढे ते पुरे करील या समजुतीने हा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.’’ हे उद्गार हृदयस्पर्शी आहेत. त्यात काम अपुरे असल्याची जाणीव आहे. सप्टेंबर ११, १९०८ ते जून ८, १९१४ या बंदिवासातील दिवसांत नैराश्यावर मात करून टिळकांनी आपल्या दु:खाचे नवनिर्मितीच्या ऊर्जेत रूपांतर केले आणि एका अलौकिक कृतीला जन्म दिला.
त्यांच्यापुढे नियतीने काय वाढून ठेवले होते हे आज आपल्याला माहीत आहे. राम व श्रीधर या दोन्ही पुत्रांनी बौद्धिक बंडखोरी केली शिवाय ते धड मार्गाला लागले नाहीत. १९१७ ते २०च्या काळात टिळकविरोधी चळवळींनी जोर पकडला. आपल्या सभा उधळल्या गेल्याचे त्यांना पहावे लागले. टिळकांच्या पुण्याईचा राजकीय वारसा गांधींकडे जाणार हे स्पष्ट होत गेले. त्यातच मधुमेहासारखे शरीर पोखरून काढणारे दुखणे जडले. तरी गीतेतून स्फूर्ती घेणारा वटवृक्षासारखा विस्तारलेला हा महापुरुष आपल्याच ओझ्यामुळे वाकला नाही की सर्व सोडून कुटुंबाच्या कुंडीतले रोपटे बनला नाही. सतत जनजागृती व स्वराज्य यांचा विचार करीत अखेपर्यंत ताठ उभा ठाकला.
टिळकांच्या मनात गीतारहस्य जिज्ञासा वयाच्या १६व्या वर्षीच जागृत झाली. युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेल्या उपदेशात निवृत्तीपर मोक्षाचे विवरण कशाला असा प्रश्न पडला. त्याचा पाठपुरावा करीत राहिल्यामुळे १९०८ साली ग्रंथ लिहिण्याइतकी तयारी झाली आणि १९१५ साली गीतारहस्याचा जन्म झाला. Works in the moments of insight willed. Are after years of labour fulfilled, या वचनाची प्रचीती येते.
गीतारहस्य हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही. भारतीय संस्कृतीच्या अभ्यासकांसाठी तो एक समृद्ध संदर्भग्रंथ तसेच बृहत्कोश आहे. सनातन धर्माचे वाङ्मय, त्याचा पसारा, त्यातील श्रद्धा, संकल्पना, सिद्धान्त, कथा, काव्य, विज्ञान तसेच त्याची गूढता, नैतिकता, ऐतिहासिकता, ऐहिकता वगैरे टिळकांच्या तोंडून समजून घेण्यासाठी गीतारहस्य वाचावे. नासदीय सूक्ताचे इंग्रजी-मराठी भाषांतरासह आकलन करून घेण्यासाठी गीतारहस्य उघडावे. गीता अर्थासकट समजून घ्यायची असेल तरी हा ग्रंथ उत्तम. समाजधुरीण, समाजशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक, साहित्यिक, कलावंत अशा सर्वासाठी ती एक खाण आहे. काय आहे हे माहीत असल्याखेरीज काय सुधारावे हे कळत नाही. यज्ञविधीचे कर्मकाण्ड म्हणून ज्याची बोळवण केली जाते त्या मीमांसाशास्त्रातले ग्रंथतात्पर्य काढण्याचे सात नियम पहावे. वकिलीच्या व्यवसायात टिळकांना मीमांक्षेच्या अभ्यासाचा उपयोग का झाला यावर प्रकाश पडतो.
नेहमी तोंडात असलेल्या अनेक शब्दांचे अर्थ गीतारहस्यातून स्पष्ट होतात, बारकावे उकलतात. येथे फक्त काही उदाहरणे घेऊ. भगवद्गीता म्हणजे भगवंताने गायलेले उपनिषद. भागवत म्हणजे भगवंतानी केलेला उपदेश. भागवत धर्मातच श्रीकृष्णाला भगवान म्हटले जाते. (मुलाचे नाव भगवान ठेवतात ते त्या अर्थाने.) उपनिषद शब्द मराठीत नपुंसक लिंगी असला तरी संस्कृतात स्त्रीलिंगी आहे म्हणून श्रीमत्भगवत्गीतासु उपनिषत्सु असे दोन स्त्रीलिंगी शब्द एकत्र येतात. गीता शब्द कोणत्याही ज्ञानपर ग्रंथास वापरला जातो. म्हणून गीता अनेक आहेत. वानगीदाखल टिळक २७ गीतांची तपशीलवार माहिती देतात. कर्म म्हणजे ‘करणे’, हालचाल, ‘व्यापार’ या अर्थाने गीतेत येतो; श्रौत किंवा स्मार्त कर्म म्हणून नव्हे. तसे कर्म करण्याच्या उत्तम साधनाला योग म्हटले आहे. पातंजल योग या अर्थाने हा शब्द गीतेत कमी वेळा येतो. ‘योग: कर्मसुकौशलम्’ हा अर्थ गीतेला अभिप्रेत आहे. म्हणजे तो प्रत्येकाच्या हिताचा प्रश्न होय. ‘आज गेम थियरीच्या हेतूशी त्याची तुलना करता येईल.
प्रस्थानत्रयीची ऐतिहासिक उकल टिळक आपल्या पद्धतीने करतात. वैदिक धर्मातील गुढतत्त्व काय यावर वेगवेगळ्या ऋषींनी वेळोवेळी उपनिषदांत आपले विचार मांडले. त्यांची एकवाक्यता करून बादरायणाने वेदान्तसूत्रे म्हणजेच ब्रह्मसूत्रे रचली. तथापि त्यात प्रवृत्ती मार्गाचे वर्णन आले नाही. ती उणीव कर्मयोग सांगून गीतेने भरून काढली. त्यामुळे उपनिषदे, वेदान्तसूत्रे व गीता यांना प्रस्तानत्रयी अर्थात वैदिक धर्माचे तीन आधारस्तंभ म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतर प्रस्थानत्रयीत जे नाही ते अग्राह्य़ मानले जाऊ लागले. म्हणून आपापल्या संप्रदायाला प्रस्थानत्रयीत बसविण्यासाठी प्रत्येकाने गीतेचा सोयिस्कर अर्थ लावला. यातून शंकराचार्याचा संन्यास ज्ञाननिष्ठ अद्वैतवाद, रामानुजांचा विशिष्ठाद्वैतवाद, माध्वाचार्याचा द्वैतवाद, वल्लभाचार्याचा शुद्धाद्वैतवाद, निंबाकींचा द्वैताद्वैतवाद (पुढे गांधींचा अनासक्तियोग.) असे पंथ निर्माण झाले. अभ्यासाअंती ते सर्व नाकारून टिळकांनी ‘‘तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, युद्धाय कृतनिश्चय:’’ हाच मुख्य संदेश देणारे कर्मयोग शास्त्र मांडले. ‘कर्मयोगाला energism व सन्यासमार्गाला quietism असे दोन मौलिक शब्द टिळक देतात. या अर्थाने पाश्चिमात्य लोक कर्मयोगीच आहेत. energism विसरलो आहोत ते आम्ही असे आवर्जून सांगतात.
पाश्चिमात्य नीतिशास्त्र विचारात घेऊन गीतेवर भाष्य लिहिण्याचा ‘गीतारहस्य’ हा मराठीतील पहिलाच प्रयत्न होय. ही तुलना कुठे सदोष असल्यास त्यावर टिप्पणी करणे हे तत्त्वज्ञानाच्या जाणकारांचे क्षेत्र होय. पण टिळकांनी पथदर्शक ग्रंथ लिहिला हे नाकारता येणार नाही. गीतारहस्याची काही वैशिष्टय़े न. र. फाटक यांनी चांगली मांडली आहेत. गीतेच्या आकलनासाठी महाभारताचा उपयोग कसा होतो हे टिळकांनीच प्रथम दाखवून दिले. गीताभ्यासाची दिशा त्यांनी बदलून टाकली. गीतार्थ समजून घ्यायचा तर आधी भौतिक शास्त्रांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे निदर्शनास आणून दिले. या ग्रंथामुळे नीतिशास्त्रावर मराठीत लेखन करण्याची उमेद अभ्यासक्रमांमध्ये निर्माण झाली. पण एरवी परखड मते देणारे न. र. फाटक येथे टिळकांचे पक्षपाती होतात. गीतारहस्याला युगप्रवर्तक ग्रंथ म्हणणे ठीक पण त्याची तुलना डार्विनच्या ‘ओरिजिन ऑफ स्पीसीज्’शी करणे म्हणजे अति झाले. शंकराचार्याचा पक्ष मांडणारे सनातनी बुरसट विचाराचे असतील तरी त्यांची कुत्सित टिंगळ करणारा मजकूर सात पाने व्यापतो, पण विष्णु वामन बापटशास्त्र्यांनी गीतारहस्याचे खंडन नेमके कसे केले हे पुस्तकात येत नाही.
टिळकांची उणी बाजूही पाहणे आवश्यक आहे. कोणताही धर्मग्रंथ एकावेळी एकाहाती लिहिलेला नाही, त्यात स्थळकालानुरूप बदल झालेले आहेत हे एकोणिसाव्या शतकात अभ्यासकांमध्ये मान्य झालेले होते. तरी गीता व महाभारत एककालीन असल्याचे टिळक गृहीत धरतात. महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीची आवश्यकता असल्याची वाच्यता १८९७ साली विंटरनिट्झने पॅरिस येथे केली होती. अखेर १९१९ साली पुण्याच्या भांडारकर ओरिएंटल इन्स्टिटय़ूटमध्ये कामाचा शुभारंभ झालेला होता. तरी टिळकांनी त्यात रस दाखविल्याचे ऐकिवात नाही. गीतासुद्धा भृगुकुळाच्या परंपरेची निर्मिती असून ती टप्प्याटप्प्याने विकसत गेलेली आहे. हे संशोधन नंतरचे असले तरी स्थळकालबद्धतेचा प्रश्न टिळकांच्या सूक्ष्म बुद्धीला शिवला नाही. याचे एकच कारण संभवते; तो त्यांना सोयीचा नव्हता. टिळकांचे संशोधन सत्यशोधनापेक्षा देशभक्तीला अधिक महत्त्व देणारे होते.
चातुर्वण्र्य हे परमेश्वराने गुणकर्म विभागश: केले (म्हणजे ते जन्मावर आधारित नाही) असे सांगणे हे गीतेचे धार्मिक मर्यादेतले पुरोगामी पाऊल होते. ‘‘गुणकर्मावर आधारित चातुर्वण्र्य हिंदुस्थानात लोपल्यासारखे झाले असले तरी पश्चिमेकडील देशात ते निराळ्या स्वरूपात आढळते,’’ असे विधान टिळक करतात. पण आपल्याकडील चातुर्वण्र्य सोज्वळ नाही. जन्मजात उच्चनीचतेच्या जातिव्यवस्थेपासून ते कधीच मुक्त नव्हते. पाश्चिमात्य देशात वर्गवारी असते पण जातवारी नसते. टिळक ज्याचा वारंवार आधार घेतात तो श्रेष्ठ तत्त्वज्ञ इमॅन्युएल कांट एका गरीब चांभाराचा मुलगा होता. त्याच्या बहिणी मोलकरणी होत्या. अन्याय त्याच्या वाटय़ाला आला तो त्याच्या उपेक्षित वर्गामुळे पण चांभार जात त्याला चिकटण्याचा प्रश्न नव्हता. थोडक्यांत, वरवरची तुलना करून सामाजिक वास्तवाच्या गंभीर प्रश्नाला टिळक बगल देतात.
खरे तर कोणतेही सत्य त्रिकालाबाधित (absolute) नसते; ते नेहमी सापेक्ष (relative, subjective) असते. सत्य हे बहुपेडी (plural) असते म्हणून गीतेतून अनेक अर्थ निघू शकतात. टिळकांनी तत्कालीन परिस्थितीनुसार कर्मयोगशास्त्र असा अर्थ लावला तो योग्यच होता. उदात्त ध्येयासाठी विजीगिषु स्फूर्ती देणारा धार्मिक ग्रंथ गीतेच्या रूपातच लोकमान्यांनी मिळवून दिला हे त्यांचे मोठे योगदान होय. पण शंकराचार्याच्या समोरचे वास्तव वेगळे होते. त्याला इस्लामची पाश्र्वभूमी होती. सनातन धर्म संघटित करण्यासाठी त्यांना बौद्ध भिख्खूंसारखे कर्मयोगी संन्यासी निर्माण करायचे होते. त्यानुसार ते वागले.‘‘आमचा कोणताही संप्रदाय नाही, असेल तर तो गीतेचा आहे,’’ असे टिळक आवर्जून सांगतात. पण देशभक्ती हा टिळकांचा संप्रदायच होता. त्यामुळे आधीच्या भाष्यकारांनी गीतार्थाला सोयीस्कर वळण देण्याचे जे तंत्र वापरले तेच टिळकांनी योजले. आपली सारी विद्वत्ता त्यासाठी पणाला लावली. पण याचा एक विपरीत परिणाम झाला. टिळकभक्ती म्हणजे देशभक्ती व टिळकांचा अभिमान म्हणजे देशाभिमान मानणारा, सतत भूतकाळाकडे पाहणारा, सुधारकांची टिंगल करणारा, मध्यमवर्गीय ब्राह्मणी संस्कृतीचा, अल्पसंतुष्ट सनातनी वर्ग उदयास आला. या वर्गातले काही सदस्य हिंदू समाजाच्या अधोगतीला जगन् मिथ्या सांगणारा शंकराचार्याचा मायावाद कारणीभूत होय असे मानणारे होते.
असे असले तरी गीतारहस्याच्या जनकाचे ऐतिहासिक महत्त्व तीळभरही कमी होत नाही. जीवनात नैराश्याचे ढग जमू लागलेले असताना, वयाच्या चौपन्नाव्या वर्षी धैर्याचा हा मेरुमणी गीतारहस्यातून संवाद साधतो तो पेन्शनरांशी नव्हे, तर तरुणांशी! त्यांना तळमळीचा सार्वकालीन संदेश देतो.
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान् निबोधत।
टिळकप्रशंसा
'गीतारहस्य’ हा अत्यंत बोलका ग्रंथ असून तो वाचत असताना लो. टिळक आपणाशी संवाद साधत आहेत, इतकेच नव्हे तर आपण त्यांच्यासह प्रगती साधत आहोत असा अनुभव येतो.. देशाची प्रदीर्घ आध्यात्मिक परंपरा टाकून द्यायची नाही आणि सनातन धर्माचे नवे स्वरूप मांडायचे अशी टिळकांची भूमिका होती. या बाबतीत न्या. रानडे व म. गांधी हे त्यांचे समानधर्मी म्हटले पाहिजेत. पाश्चात्त्यांचा ेसुखवाद टिळकांना मान्य नव्हता. कारण त्यावर आधारलेली नीती टिकत नाही व सुखाची समान वाटणी करता येत नाही.. टिळकांनी आपल्या आयुष्याची सुरुवातच मरगळलेल्या समाजात चैतन्य आणण्याचा चंग बांधून केली होती आणि त्याचीच परिणती पुढे गीतारहस्य लिहिण्यात झाली.
- मे. पुं. रेगे, जानेवारी १९९८
लोकमान्य वास्तविक संस्कृतज्ञ, पण त्यांची भाषा अगदी साधी आणि सुबोध. अनेक पारिभाषिक शब्द त्यांनी तयार केले आणि त्यायोगे मराठी भाषा समृद्ध केली. त्यांच्या भाषेच्या साधेपणाचे रूपांतर सवंगपणात किंवा निर्जीवपणात होत नाही.. विद्वत्तेचा डौल मिरविण्याऐवजी अंत:करणाचा ठाव घेण्याकडेच त्यांचे लक्ष केंद्रित झालेले होते. लेखन हा एक स्वाध्याय आहे असे ते मानीत. लेनिनच्या शैलीशी काही बाबतीत त्यांचे साम्य आहे.-
- गोविंद तळवलकर
...Reformers of society are always in a minority and generally not liked; but due to Tilak, the Maharashtra social reformers became, in the eyes of the literates, objects of ridicule and hate.-
-P. D. Jagirdar, 1971...
ओरायन’मध्ये ज्योतिषविषयक ज्ञान, ‘आर्याचे वसतिस्थान’ यामध्ये रम्य कल्पनाचातुर्य आणि गीतारहस्यात खोल तात्त्विक विचार. पहिला ग्रंथ विशिष्ट ज्ञानप्रचुर, दुसरा प्रतिभोद्दीपित आणि तिसरा पांडित्यमंडित असा आहे. दुसऱ्या दृष्टीने असे म्हणता येईल की पहिला व दुसरा ग्रंथ सात्त्विक-राजस व तिसरा शुद्ध राजस गुणदर्शक आहे.-
-तात्यासाहेब केळकर
(हे उद्गार टिळकप्रशंसेचे उत्तम quotation ्ल होय. वरील तीनही ग्रंथांतील टिळकांची मते बिनचूक व निर्दोष आहेत असे न. र. फाटक गृहीत धरून चालतात आणि गोविंद तळवलकर फाटकांवर विसंबून राहतात. त्यांचा आवाज महाराष्ट्रात शिष्टसंमत झाला.)

13 August, 2009

दवंडी : पळा रे पळा.. आकाश पडलं !!!

माध्यम क्रांती अनेक संधी उपलब्ध करुन देते. निवडीला पर्याय देते. पण उडदामाजी काळे गोरे कसे निवडावे? काय घडतंय यापेक्षा काय काय घडणार आहे आणि त्याला आपण कसे सामोरे जाणार आहोत. त्याचा फायदा आपण कसा करुन घेणार आहोत हे ठरवण्यासाठी ही दवंडी..

एकदा एका राज्यात एक राजा राज्य करीत होता. (प्रत्येक कथेची सुरुवात अशीच करायची असते.) एकदा त्याचे केस कापताना त्याच्या नाभिकाच्या असे लक्षात आले की, राजाला तीन कान आहेत. त्याला हसू आले. राजाने त्याला दटावले. कोणालाही हे सांगितलेस तर मुंडके उडवीन अशी धमकी दिली. त्या नाभिकाची मोठी पंचाईत झाली. आपल्याला एवढे मोठे रहस्य माहीत आहे आणि आपण ते कुणालाच सांगायचे नाही? बायकोलाही नाही? हैराण झाला तो.. दोन दिवस त्याने कळ काढली, पण मग त्याच्या पोटातच दुखू लागले. शेवटी तो एका जंगलात गेला आणि एका हरणाच्या कानात त्याने ही गोष्ट सांगितली.. राजाला तीन कान.. मन मोकळे झाले. पोटदुखी थांबली. तो परत आला. पुढे कुणी तरी त्या हरणाची शिकार केली. त्याच्या चामडय़ापासून कुणी तरी वाद्य केले. वाद्य वाजवणारा राजाचे मन प्रसन्न करण्यासाठी राजवाडय़ात आला. त्याने वाद्य वाजवायला सुरुवात केली आणि त्यातून राजाला तीन कान, राजाला तीन कान असेच बोलू उमटू लागले.


तात्पर्य काय, एखादी गोष्टी कितीही दाबून टाकली तरी ती केव्हा तरी समोर येतेच. कशीही येते, पण आजकाल एवढा काळ थांबायची गरज राहिलेली नाही आणि जंगलात जाऊन हरणाचे कान फुंकायचीही गरज राहिलेली नाहीए. अशी हरणं पावलोपावली भेटतात. आणि त्यांच्या कानात बातम्या सोडणाऱ्या माध्यमांचा तर काय सुकाळूच झालेला आहे.

कुणीतरी म्हटलेलं आहे की, बॅड न्यूज इज अ व्हेरी गुड न्यूज. कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी होत नाही.. माणूस कुत्र्याला चावला तर होते. त्यामुळे सध्या माध्यमांना सुगीचे दिवस आलेले आहेत. स्वाइन फ्लू या रोगाने त्यांचा बातम्यांचा प्रश्न सोडवून टाकलेला आहे. कुणाला माझं बोलणं क्रूरपणाचं वाटेल, पण जरा नीट शांत डोक्याने विचार करा. सगळे डॉक्टर्स ओरडून सांगत आहेत की, स्वाइन फ्लू हा प्रश्नणघातक रोग नाहीए. जे बळी गेले ते एक तर निष्काळजीपणाचे आहेत किंवा त्यांना एकाच वेळी अनेक आजार झाले होते. ज्याचे निदान झाले तर केवळ सहा दिवसांमध्ये माणूस खडखडीत बरा होतो अशा या रोगाला जणू काही प्लेगची साथ आली आहे असे स्वरूप देण्यास माध्यमे कारणीभूत आहेत.

दिल्लीमें स्वाइन फ्लू का एक रोगी मिला.. स्कूलमें लगा ताला.. अहमदाबादमे स्वाइन फ्लूने किया हमला.. एकने गवाँई जान किंवा पुण्यात हाहा:कार.. जनतेत घबराट.. अशा बातम्या देऊन लोकांच्या मनात कमालीची भीती निर्माण करण्यात येते आहे. होय, आहे. हा आजार आहे. त्याचा प्रसार शिंकांतून, खोकल्यातून होतो. काळजी घेण्याची आवश्यकता आहे हे सगळं खरं असलं तरी साप साप म्हणून भुई धोपटण्यासारखा प्रकार होतो आहे. सरकार पातळीवरून पत्रकबाजी करून त्यात आणखी भर टाकली जाते आहे.

मेक्सिकोसारख्या देशाने अत्यंत कमी कालावधीत या रोगाचे जवळपास उच्चाटन केले. सोपी गोष्ट. गर्दी टाळा. सगळी पब्लिक फंक्शन्स बंद करा. शाळा-कॉलेज ऑफिसेस काही काळ बंद करा. सहा दिवसांचे या व्हायरसचे आयुष्य आहे. त्यानंतर तो मरेल. त्यांनी हे केले. आपल्याकडे हे होणार नाही. कारण आपल्याला उत्तरं शोधायची नाहीएत. प्रश्नांचा बागुलबुवा करून त्यावर पोळी भाजून घेण्यात आमच्या लोकांना रस आहे. या रोगावर टॅमी फ्लू नावाची एक गोळी आहे. पण ती म्हणे फक्त सरकारी दवाखान्यातच मिळते. का? का नाही सगळीकडे मिळत? रक्त तपासणी करणाऱ्या लॅब इतक्या कमी का? सरकारी इस्पितळाची परिस्थिती पाहिली तर तिथे लोकांनी येऊन कल्ला करावा असं करण्यामागची मनोवृत्ती आणि गर्दीच्या वेळी नाकाबंदी लावून लोकांचे हाल करणे किंवा तेव्हाच रस्त्याची कामे काढणे यामागची सरकारी मनोवृत्ती एकच आहे. लोकांना त्रास झाला पाहिजे. लोकांनी आपल्याकडे दयेची भीक मागितली पाहिजे. नाही तर मग आम्ही नेते कसे? लोकांचे प्रश्न सुटले तर आपल्याकडे कोण येईल? लोक कायम रंजलेले गांजलेले राहिले तरच या तथाकथित नेत्यांना महत्त्व आहे.

जरा आकडेवारी पाहा. पुण्याची लोकसंख्या साधारण पस्तीस लाख. त्यात रुग्ण ११८. मुंबईची लोकसंख्या किती? दीड कोटी. रुग्ण किती ५५. काय गुणोत्तर प्रमाण आहे? नगण्य. पुण्यामध्ये आणि मुंबईत लाखो लोकांना टीबी झाला असेल. जो जास्त धोकादायक आहे. त्याचाही प्रसार थुंकीतून, श्वासातून होतो. त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. साध्या फ्लूमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या स्वाइन फ्लूच्या बळीपेक्षा किती तरी पटींनी जास्त आहे. सांगणारे कंठशोष करून सांगतात. पण ऐकतो कोण? माध्यमांची ताकद वाईट गोष्टींसाठी वापरली जाते आहे.

जगात कोणत्याही गोष्टीची विक्री ही केवळ भीती या भावनेनेच करता येते. फिअर फॅक्टर महत्त्वाचा, असं केलं नाही तर तसं होईल. की आपण लागलो धावायला. एका सशाच्या पाठीवर झाडाचं पान पडलं तर तो वळूनही न पाहता आकाश पडलं, आकाश पडलं, म्हणून धावत सुटला. समोर दिसेल त्याला सांगत सुटला.. पळा रे पळा.. आकाश पडलं. तसं आपलं झालंय. अत्यंत शांतपणे संघटितपणे याचा मुकाबला आपल्याला सहज करता येईल असं का नाही वाटत आपल्याला? आणि एवढं आपलं काळीज जर सशाचं असेल तर मग खरोखरीची भयग्रस्त करणारी परिस्थिती आली, तर आपण त्याला कसं तोंड देणार आहोत. माध्यमांनी मनोबल वाढवायचं की खच्ची करायचं? याच्याकडे कुणी लक्ष देणार आहे की नाही? का पेपरात आलेली प्रत्येक बातमी आणि टीव्हीवर आलेली प्रत्येक ब्रेकिंग न्यूज ही ‘बाबा वाक्यम प्रमाणम’ म्हणून आपण त्यावर आपलं जीवन अवलंबून ठेवणार आहोत? या सगळ्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. स्वाइन फ्लू उद्या जाईल, पण त्यातून काही धडा आपण शिकणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे.